मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दोन धरणांमध्ये पाणीसाठा अधिक !

अचलपूर जलसंपदा विभागांतर्गत चार धरणांपैकी तीन धरणांमध्ये पाण्याचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. केवळ पूर्णा धरणाची पातळी तीन टक्क्याने घसरली आहे.
पूर्णा, चंद्रभागा, शहानूर आणि चारगड ही विभागांतर्गत चार महत्त्वाची धरणे असून यावर्षी २३ एप्रिलच्या स्थितीवर सदर कार्यालयात नमूद आकडेवारीवरून समाधानकारक परिस्थिती स्पष्ट झाली आहे. सर्वात मोठे असलेल्या पूर्णा धरणात २१.५८१५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून ६१.०२ टक्के पाणीसाठा
आहे. मागील वर्षी याच तारखेच्या स्थितीवर ६४.३० टक्के पाणीसाठा होताः मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २ टक्के पाणीसाठा कमी आहे. मेळघाटच्या सीमेवर निर्मित दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्याचंद्रभागा धरणामध्ये २७.२१४४ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून टक्केवारीत ६५.९८ इतका आहे. मागील वर्षी हा साठा ६०.८९ इतका होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात ५ टक्के पाणीसाठा जास्त आहे.
शहानूर धरणामध्ये २२.१५ दलघमी उपयुक पाणीसाठा असून टक्केवारीमध्ये हा साठा ४८.१२ इतका आहे.
मागील वर्षी या धरणातील साठा ५४.८३ इतका होता. यावर्षी सदर धरणात ६ टक्के पाणी कमी आहे. याचे कारण असे की, सदर धरणामधून २५० गावांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. २५० गावांतील लाखो लोकांची तहान भागवण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी सोडले जात आहे.
त्याचप्रमाणे चारगड नदीवर बांधण्यात आलेल्या चारगड धरणात यावर्षी उपयुक्त पाणीसाठा ६.६३२५ दलघमी इतका असून ६७.१४ टक्के इतका आहे. मागील वर्षी ६२.३६ टक्के इतका होता. त्यामुळे यावर्षी सदर धरणात ५ टक्के पाणीसाठा जास्त आहे.
पूर्णा आणि चंद्रभागा धरणाचा प्रत्येकी १ कालवा सुरू असून २१ एप्रिलपासून पूर्णा धरणाचे पाणी कालव्याद्वारे उन्हाळी पिकांसाठी किसान पाणीवापर संस्थेच्या मागणीनुसार सोडले जात आहे, तसेच चंद्रभागा धरणातूनही डाव्या कालव्याद्वारे प्रतिसेकंद २. ८७ दलघमी पिकांसाठी पाणी सोडले जात असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता जीवन जाधव यांनी दिली आहे.