पत्रकारांनी घेतले कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे
दर तीन महिन्याने होणार कार्यशाळा एमकेसीएल व श्रमिक पत्रकार संघाचा पुढाकार

अमरावती : एमकेसील व अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी सकाळी आयोजित कार्यशाळेत शहरातल्या पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे घेतले. या स्वरूपाची कार्यशाळा दर तीन महिन्याने नव्याने येणार्या माहितीसह घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पत्रकारितेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) उपयोगिता या विषयावर ही दोन तासांची नि:शुल्क कार्यशाळा शेगाव नाका चौकातील मुराई मार्केटमध्ये असलेल्या नॅसकॉम कॉम्प्युटर्समध्ये घेण्यात आली. सर्वप्रथम माँ रसस्वती पूजन एमकेसीएलचे विभागीय समन्वयक देवेंद्र पाथरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, नॅसकॉमचे संचालक जयेश मालविय, जयंत लोही, निकेश सोनी यांच्याहस्ते करण्यात आले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमोल इंगोले, सचिव रवींद्र लाखोडे, सहसचिव प्रदीप भाकरे, कृष्णा लोखंडे यांनी कृतज्ञता म्हणून एमकेसीएल व नॅसकॉमच्या अधिकार्यांचा सत्कार केला.
सुरूवातीला देवेंद्र पाथरे यांनी जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने होत आहे आणि आपल्यासाठी ती कशी उपयोगात येऊ शकते, याची माहिती दिली. जयेश मालविय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी भाषिनी, चॅटजीपीटी, नेऊरल रार्यटर, अडोब फायरफ्लाय, क्विलबॉट, विगल हे टुल्स कसे वापरायचे याची माहिती देऊन त्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. त्यात भाषांतर, लेखासाठीचे मुद्दे, बातम्यांसाठी आवश्यक तांत्रिक माहिती, मथळे, संकल्प चित्र, व्हीडीओ याचा समावेश होता.
देवेंद्र पाथरे यांनी ते अधिक सोप्या भाषेत सविस्तरपणे समजून सांगताना सायबर सुरक्षितता कशी बाळगावी याची माहिती दिली. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दोघांनी दिली. पत्रकार व संगणक परिचालक यांच्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. संचालन पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर यांनी केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.