जिल्हाधिकाऱ्यांचा अलर्ट; नियंत्रण कक्ष ‘२४ बाय ७’
तात्पुरती निवारे सज्ज ठेवा, सायरन खरेदीचे यंत्रणांना निर्देश, बैठकीद्वारे आढावा

अमरावती : सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत सर्व शासकीय यंत्रणांना तत्पर राहण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये विविध विभागांच्या कंट्रोल रूम २४ बाय ७ सुरू ठेवा, शिवाय तात्पुरती निवारे सज्ज ठेवण्यासोबतच सायरन खरेदी करा, वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शनिवारी पत्राद्वारे
दिले आहे. युद्धजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सध्याची परिस्थिती, नागरिक, पायाभूत सुविधा व संभाव्य जोखीम लक्षात घेता स्थानिक तयारी आणि प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा तत्काळ पावले उचलण्यात आली आहे.
शासनाद्वारा प्राप्त निर्देशाचे अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांद्वारा यंत्रणेचा आढावा घेण्यात आला, बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाचे सीईओ अनिल भटकर, प्रभारी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस उपायुक्त, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह अनेक विभागप्रमुख उपस्थित होते.
वीजपुरवठा खंडित होणार नाही, दक्षता घ्या खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यासोबतच दाटवस्ती असलेल्या भागात मोबाइल नेटवर्क कमी होणार नाही, याची काळजी घ्या व सायरनबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा. नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सुरू असल्याची खात्री करा.
सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहतील, कक्षात कर्मचारी ड्युटीवर राहतील, पोलिस यंत्रणा, होमगार्ड, अग्निशामक विभाग, जिल्हा शोध व बचाव पथक, आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, एनएसएस, आरोग्य विभाग आवश्यक सुविधेसह तयारीत असल्याची खात्री करा.
चुकीचे संदेश लोकांमध्ये जाणार नाहीत, काळजी घ्यालो कांमध्ये ‘काय करावे, काय करू नये’ यासह चुकीचे संदेश लोकांमध्ये जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी शाळा, पंचायत, बाजार संघटनेद्वारा तेथील समुदायाचे लक्ष केंद्रीत करून संरक्षणाच्या दृष्टीकोनातून जनजागृती करण्यासाठी मॉकड्रिल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
युद्धजन्य स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात सर्व सोयीनिशी निवारे केंद्र उपलब्ध ठेवा व सार्वजनिक इमारतींमध्ये अतिरिक्त निवारे सुरू होऊ शकतात का, याची खात्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.