लग्नाचे आमिष दाखवत 25 वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार : पोलिसाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेल्या नराधमानं शिक्षिकेवर बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक : शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवत पोलिसानं वारंवार अत्याचार केल्यानं मोठा खळबळ उडाली. याप्रकरणी नाशिक पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात पीडित शिक्षिकेनं तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभी उर्फ चंद्रकांत दळवी असं नराधम पोलिसाचं नाव आहे.
शिक्षिकेला लॉजवर नेत बलात्कार : पीडित शिक्षक महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेची ओळख 2020 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई अभी उर्फ चंद्रकांत दळवी याच्याशी झाली. यानंतर कालांतराने पीडित महिलेच्या घरच्यांशी दळवी याचे कौटुंबीक संबंध निर्माण झाले. त्यानंतर त्याने ओळखीचा गैरफायदा घेत पीडित महिलेला बळजबरीने लॉजवर नेत तिच्याशी बळजबरी केली. यानंतर पीडित महिलेने घरच्यांशी लपून दळवी याच्याशी विवाह केला. यानंतर सन 2020 ते 23 मे 2025 या कालावधीत नराधमानं पीडितेचा छळ करून बलात्कार केला. त्याने नाशिकच्या राणेनगर येथील लॉज, सातपूर येथील लॉज, डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केले. तर दळवी यांना माझ्या घरचा विवाहास विरोध असल्याचे सांगत पुन्हा एकत्र राहण्यास विरोध केला. या प्रकरणी पीडितेने 15 मे रोजी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
काय म्हटलं आहे तक्रारीत : दळवी हा केवळ महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्यापुरता संपर्क करू इच्छित होता. एका महिलेला तसे मोबाईलद्वारे मेसेज पाठवले होते. मात्र पीडित शिक्षिकेने त्याला विरोध केला असता, दोघांचे जुने फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत होता. पीडितेच्या विवाहानंतरही दळवी याने तिला त्रास देणं सुरूच ठेवलं. त्यामुळे शिक्षक महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नराधम पोलीस अटकेत : “महिलेच्या तक्रारीवरून आम्ही संशयित आरोपी चंद्रकांत दळवी याला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला आज न्यायालयात हजर करणार आहोत,” असं इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलं.