भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी अमरावतीत तिरंगा रॅली; नवनीत राणा म्हणाल्या…

अमरावती : गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यामुळं भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी भाजपाकडून रविवारी दुपारी 12 वाजता भर उन्हात अमरावतीत तिरंगा रॅली काढण्यात आली.
रॅली काढायला दोन तास उशीर : अमरावती शहरातील राजकमल चौक येथून सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली निघेल, असं भाजपाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी जाहीर केलं होतं. मात्र, पक्षाचे नेतेच दुपारी 11.20 ला राजकमल चौका येथील कार्यक्रमास्थळी पोहोचले. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, भाजपाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या 12 वाजता राजकमल चौक येथे पोहोचल्यावर त्यांनी माजी सैनिकांचा सत्कार केला आणि उपस्थितांना मार्गदर्शन गेल्यावर 12 वाजून 20 मिनिटांनी भर उन्हात तिरंगा रॅली निघाली.
दीडशे ते दोनशे जण रॅलीत सहभागी : दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी राजकमल चौक येथून नवनीत राणा यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन दीडशे ते दोनशे जण या रॅलीत सहभागी होते. शाम चौक, प्रभात चौक, जवाहर गेट, सरोज चौक येथून तिरंगा रॅली जयस्तंभ चौक येथे पोहोचली. जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नवनीत राणा, डॉ. नितीन धांडे, अॅड.प्रशांत देशपांडे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर जयस्तंभ चौक येथे राष्ट्रगीतानं तिरंगा रॅलीची सांगता झाली. यावेळी, बदल कुळकर्णी, चेतन पवार, शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, प्रा.रवींद्र खांडेकर प्रा. संजय तीरथकर, मिलिंद बम्बल यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तिरंगा रॅली सहभागी होते.
सैन्यानं पाकिस्तानला चांगला धडा शिकवला : “पहलगाममध्ये धर्म विचारून कलमा वाचायला लावून दहशतवाद्यांनी निरापराधांना ठार मारलं. आम्ही स्वतःचं रक्त सांडवू मात्र कलमा कधीही वाचणार नाही. आमच्या सैन्यानं पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. आता पाकिस्तान डोळे वटारून देखील पाहणार नाही आणि जर अशी त्यांनी हिम्मत दाखवली तर पाकिस्तानचा बाप म्हणजेच आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत बसले आहेत. हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावं. आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत,” असं तिरंगा रॅलीला संबोधित करताना अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या.