ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

ग्रँड सोहळ्याने अमरावतीकरांचे डोळे दीपवले

मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांवर फुलांचा वर्षाव; ७२ आसनी विमान मुंबईकडे झेपावले; अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती

अमरावती : बहुप्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाहून बुधवारी पहिल्यांदाच प्रवासी विमान सेवेला थाटात प्रारंभझाला. मुंबईहून आलेले विमान सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी अमरावती विमानतळाच्या धावपट्टीपर उतरताच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अग्निशमन चमूने दोन्ही बाजूने ‘वॉटर कॅनल सॅल्यूट’ करून विमानाचे अभूतपूर्व स्वागत केले. अमरावतीकरांना हा ग्रैंड सोहळा प्रथमच अनुभवता आला नि अनेकांनी तो डोळ्यात साठवून ठेवला.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या देखरेखीत अमरावती विमानतळाची निर्मिती ३८० कोटी रुपये खर्चुन पूर्णत्वास आली आहे. या विमानतळाच्या धावपट्टीवर पहिल्यांदाच एटीआर-७२ प्रवासी वाहतूक विमानाचे आगमन झाले. कर्मचाऱ्यांनी मंत्रिमहोदयांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी रेड कार्पेट अंथरले. या विमानातून प्रथमतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडले. त्यानंतर इतर पाहुण्यांचे आगमन झाले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री डॉ. आकाश पुंडकर, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय खोडके आदींचा समावेश होता. धावपट्टीवरच पाहुण्यांवर गुलाबपुष्पांची उधळण तसेच ढोल-ताशांचा गजर करण्यात आला.

विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी अधिकारी वृंदाने यावेळी मंत्र्यांसह सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

 

विमानतळाचे उद्घाटन, विमानसेवेचा थाटात शुभारंभ

अमरावती विमानतळाचे उ‌द्घाटन, प्रवाशी विमानसेवेचा थाटात शुभारंभआणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक बुधवारी पार पडले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूकमंत्री किजरापू राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री आकाश फुंडकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ,खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार संजय खोडके, डॉ. संजय कुटे, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, माजी खासदार नवनीत राणा, परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आदी उपस्थित होते.

 

नवनीत राणा यांचा मुंबई ते अमरावती विमान प्रवास माजी खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी मुंबई ते अमरावती विमान प्रवास केला. अमरावती विमानतळाचे लोकार्पणात नवनीत राणांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे व अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एमएडीसीच्या संचालक स्वाती पांडे यांच्यासह विमान प्रवास केला. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत सेल्फी देखील काढला.

अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होताच तो क्षण अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक ठरला. स्वप्न प्रत्यक्षात उतरले. आजपासून अमरावती हवाई मार्गे थेट जगाशी जोडले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनात अमरावती शहराच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल माईलस्टोन ठरणार असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.