क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मुंबई विमानतळावर पावणेआठ कोटींच्या कोकेनसह परदेशी प्रवासी अटकेत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सुमारे ७८५ ग्रॅम कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे पावणे आठ कोटी रुपये किंमत आहे. या प्रकरणात एका परदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी युगांडामधून भारतात आला होता. त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते.

संशयीत प्रवाशाला पकडले

युगांडा येथून ९ एप्रिल रोजी आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला थांबवले. चौकशीदरम्यान संबंधित प्रवासी घाबरलेला व अस्वस्थ असल्याचे दिसले. नंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात पोटात पिवळ्या रंगाच्या अनेक कॅप्सूल असल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्या पोटातून गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. त्या गोळ्यांमध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंचनामा करून कोकेन जप्त करण्यात आले. आरोपीकडून एकूम ७८५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या अमली पदार्थाची अंदाजित किंमत सात कोटी ८५ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रवाशाला त्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आहे. आरोपी प्रवाशाला कोकेन तस्करीसाठी रक्कम मिळणार होती. त्यापूर्वीच त्याला अटक झाली. आरोपीच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई कोकेनचे वितरण केंद्र

मुंबई व दिल्लीत येणारा कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधिक आहे. उच्चभ्रू घरातील तरूणांकडून कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रिकी देशांतून कोकेनची सर्वाधिक तस्करी होते. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे. कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमधील नागरिकांचा वापर करण्यात येत होता. सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर करण्यात येत आहे. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई आणि मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन आणण्यात येते. भारतात राहून बेकायदेशीर कामे करण्यासाठी हे तस्कर नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.