ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अमरावतीचे 36 पर्यटक सुखरूप

अनेकजण श्रीनगरमध्ये अडकले जिल्हा प्रशासन संपर्कात

अमरावती : काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण देशातील यंत्रणा हाय अलर्टवर आहे. गोळीबाराच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील अनेक पर्यटक याच भागात होते. घाबरलेले पर्यटक आता सुखरूप असून, जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहेत. येत्या दोन दिवसात हे पर्यटक अमरावतीला परत येणार आहे.

अमरावतीतील अनेक पर्यटक काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले. तेथे ते हसत खेळत पहलगामच्या वातावरणात हरवले होते. त्यांनी तेथे व्हिडिओ, फोटो काढले. या कुटुंबियांमध्ये सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश होता. काही वेळानंतर ते तिथून निघाले आणि काही क्षणातच तेथे दहशतवादी हल्ला झाला. तोपर्यंत ते सुखरुप स्थळी पोहचले होते. सध्या ते श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने या पर्यटकांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही पर्यटक श्रीनगर आणि पहलगाम येथील हॉटेलमध्ये थांबून आहेत. हे पर्यटक कालच्या घटनेने हादरून गेले आहेत. अनेक पर्यटकांनी आपल्याला रात्रभर झोप देखील लागली नाही, असे सांगितले. आंचलविहार, ईश्वर कॉलनी परिसरातील २२ पर्यटकदेखील काश्मिरला गेले होते. ते सर्व सुखरूप असून श्रीनगरहून दिल्ली येथे विमानाने रवाना झाले आहे. जिल्ह्यातील करजगाव येथूनही काही पर्यटक पहलगाम येथे गेले होते, तेही सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. हे पर्यटक आता घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत.

विविध ट्रॅव्हल कंपन्यांद्वारे काश्मीरमध्ये गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. आम्ही स्थानिक सहल संयोजकांच्या संपर्कात आहोत. पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते आहे, अशी माहिती विविध ट्रॅव्हल कंपनी संचालकांनी दिली आहे.

सहलीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातून सुमारे ४६ पर्यटक सध्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनास गेले आहेत. जिल्हा प्रशासनच्या आपत्ती व्यवस्थापक कक्षाने पर्यटकांशी संपर्क केला आहे. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिगो विमानाचे स्पेशल फ्लाईट पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, येत्या दोन दिवसात सर्व पर्यटक सुखरुप घरी पोहोचतील, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.